भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी
सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार १२ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय परिषद असून यामध्ये संपूर्ण देशभरातून सुमारे सातशे विद्यार्थी व अध्यापक सहभागी होणार आहेत.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव उपस्थित राहणार आहेत. तसेच विषय तज्ञ म्हणून मुंबई येथील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कृष्णा अय्यर व गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ.शैलेंद्र गुरव उपस्थित रहाणार आहेत.
भारतीय औषध कंपन्या तर्फे गेल्या काही वर्षात नवीन औषधांच्या निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. देशातील पारंपारिक औषधांना वैज्ञानिक बैठक देऊन त्याद्वारे नवीन औषधांची निर्मिती करणे हे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. यादृष्टीने शैक्षणिक क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ही दोन प्रमुख उद्दिष्टे दृष्टिक्षेपात ठेवून औषध संशोधन क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय जगताप यांनी दिली. सकाळचे सत्र मार्गदर्शनपर असेल व दुपारच्या सत्रात भित्तिपत्रक स्पर्धा घेतली जाईल.
ही राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.तुषार रुकारी, डॉ.रोहन बारसे, डॉ.प्रशांत माळी, प्रा.विनोद मुळे, प्रा.रश्मी महाबळ तसेच डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे व विभाग प्रमुख प्रा.ओंकार पेंडसे मेहनत घेत आहेत.
प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी