आचरा कणकवली रस्त्यावरील वाढते गतीरोधक ठरतायत वाहतूकीस धोकादायक
तातडीने हटविण्याची वाहनचालकांची मागणी
आचरा : आचरा कणकवली मार्गाच्या नुतनीकरण कामात ठेकेदाराकडून रस्त्यावर बेसूमार घालण्यात आलेले गतीरोधक वाहतूकीस धोकादायक ठरत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर गतिरोधक तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वाहतूक संघटनेचे विजय सावंत यांनी दिला आहे.
याबाबत कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारयांशी संपर्क साधल्यावर सदर गतीरोधक नियमानुसार नसल्याचे सांगत लवकरच संबंधित ठेकेदाराला गतीरोधक हटविण्यासाठी नोटीस देणार असल्याचे सांगण्यात आले.
आचरा कणकवली मार्गाचे डांबरीकरण काम सुरू झाले आहे.मात्र रस्ता सुस्थितीत येवूनही पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जलद वाहतूकीला आळा घालण्यासाठी त्या त्या भागातील ग्रामस्थांचा निर्वाळा देत ठेकेदाराकडून कणकवली आचरा रस्त्यावर आतापर्यंत नव्याने सतरा गतीरोधक घालण्यात आले आहेत.यातच यापूर्वीच्या गतीरोधकांची भर पडली असून संपूर्ण आचरा कणकवली मार्गावर वीस पंचवीस च्या आसपास गतीरोधक निर्माण केले गेले आहेत. यामुळे रस्ता सुस्थितीत येवूनही पूर्वी खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना लागणारा वेळ आणि त्रास वाढलेल्या गतीरोधकामुळे आताही अनुभवा्वा लागत आहे.तसेच गतीरोधक घातलेल्या ठिकाणी गतीरोधकाबाबत माहिती देणारे फलक किंवा नजरेत भरतील अशा पांढऱ्या पट्ट्या देखील मारलेल्या नसल्याने वाहतूकीस अडथळा ठरत आहेत.यामुळे अपघातही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत प्रवाशी वाहतूक संघाचे विजय सावंत यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम उप विभाग कणकवली यांना आचरा कणकवली मार्गावरील गतीरोधक तात्काळ हटविण्याबाबत निवेदन देवून लक्ष वेधले जाणार आहे.या निवेदनाद्वारे शासनाच्या ध्येय धोरणानुसार आचरा कणकवली मार्गाचे नुतनीकरण न करता या मार्गावर अनधिकृत रित्या गतीरोधक घालणारया संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवली येथील अधिकारयांशी फोनवरून संपर्क साधला असता सदर गतीरोधक नियमानुसार नसल्याचे सांगत गतिरोधक संपविण्यासाठी रस्ता ठेकेदारास नोटीस देणार असल्याचे सांगितले
अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा