मालवणात रंगणार “क्रिकेटचा महासंग्राम”

लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण, “कोकण नाऊ”तर्फे सलग तिसऱ्या वर्षी ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित “कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३” , ४ कॅमेऱ्यांद्वारे प्रेक्षकांना लाईव्ह स्वरूपात पाहता येणारी पहिली स्पर्धा 

मालवण : कोकणचं नंबर १ चं चॅनेल “कोकण नाऊ”तर्फे यावर्षीही ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित ‘कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३’ संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील गाजलेल्या टेनिस क्रिकेटपटूंमध्ये दि. १५ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान मालवणच्या बोर्डिंग मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम रंगलेला पाहायला मिळणार आहे. मागील दोन वर्षे कोकण नाऊ प्रीमिअर लीगला तुफान प्रतिसाद मिळाला होता. 
    दि. १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मालवणच्या बोर्डिंग मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम होणार असून “कोकण नाऊ”च्या जगातील कानाकोपऱ्यातील दर्शकांना घरबसल्या युट्यूब, फेसबुक आणि केबल चॅनेलवर पाहता येईल. सिंधुदुर्ग जिल्हयातील ही नावाजलेली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा असून ४ कॅमेऱ्यांनी प्रेक्षकांसाठी लाईव्ह स्वरूपात प्रसारित करण्यात येणार आहे. स्पर्धेत एमसीए मान्यताप्राप्त तज्ञ पंच आणि समालोचक या स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून स्पर्धेत १६ संघाना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती संचालक विकास गावकर यांनी दिली. 
    ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पहिले बक्षीस रोख २ लाख ५१ हजार रुपये, आकर्षक चषक तर दुसऱ्या क्रमांकासाठी रोख १ लाख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी रोख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच चौथ्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक ही तसेच अन्य बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघात जिल्ह्यातील तसेच अन्य राज्यातील नावाजलेले खेळाडू आपले कौशल्य दाखवतील. यामुळे “कोकण नाऊ”च्या दर्शकांसाठी ही एक विशेष पर्वणी ठरेल. मालवणच्या बोर्डिंग मैदानावर रंगणाऱ्या स्पर्धेच्या सर्व दिवसात क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. स्पर्धेत यावर्षी सुद्धा स्थानिक तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून संघ दाखल होणार आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक संघानी सहभाग दर्शवावा, असे आवाहन कोकण नाऊचे संचालक विकास गावकर आणि संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.     
साडेसहा फूट उंचीचा चषक आणि मालवणी समालोचक बादल चौधरी यांचे विशेष आकर्षण : या स्पर्धेत तब्बल साडेसहा फूट उंचीचा चषक विजयी संघाला देण्यात येणार आहे. स्पर्धेत गोवा तसेच महाराष्ट्रातून अनेक मातब्बर संघ सहभागी झाले आहेत. तर वालावल गावचे सुपुत्र बादल चौधरी यांची मालवणीतील कॉमेंट्री आणि प्रोफेशनल पद्धतीने केले जाणार कव्हरेज या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहणार आहे.         
 मालवणचे बोर्डिंग ग्राउंडही सज्ज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “क्रिकेटची पंढरी” म्हणून ओळखले जाणारे मालवणचे बोर्डिंग मैदानही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. या मैदानावर आजपर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेचे सामने पार पडलेत. तर जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा आणि भारतीय संघातील उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ यांनीही मालवणच्या या मैदानावर आपली लाजवाब खेळी साकारलीय. याच मैदानाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्रिकेटच्या गौरवशाली मातब्बर खेळाडू घडवलेत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण

error: Content is protected !!