कनेडी राड्या प्रकरणी इतर संशयित लवकरच अटकेत
सात संशयितांना न्यायालयीन कोठडी
टप्याटप्याने होणार कारवाई
कणकवली : कनेडी बाजारपेठ येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी कलम ३०७ च्या गुन्ह्याखाली पोलिस कोठडीत असलेले शिवसेनेचे कुणाल सावंत, मंगेश सावंत आणि योगेश वाळके या तिघांना तर 353 कलमाखाली पोलिस कोठडीत असलेले भाजपचे अनिल राजाराम पांगम, संतोष वसंत आग्रे आणि शिवसेनेचे संदीप बाळकृष्ण गावकर व तुषार श्यामसुंदर गावकर या चौघांना शुक्रवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कणकवली न्यायालयात हजर केले असता न्या. टी.एच. शेख यांनी त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान या गुन्ह्यातील इतर संशयित आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित यांची नावे याच फिर्यादीत इतर गुन्ह्यातही आहेत, त्यांनाही याप्रकरणी ताब्यात घेतले जाणार आहे.
कनेडी राडाप्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या परस्पर विरोधी फिर्यादीनुसार दोन्ही बाजुच्या प्रत्येकी 19 ते 20 जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल आहे. तर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 353 चा गुन्हा काही जणांवर दाखल आहे. तर कलम 324 खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यात अद्यापही सुमारे 40 जणांना अटक बाकी आहे. यात दोन्ही राजकीय पक्षांचे बडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. आतापर्यंत 307 कलमाखाली सहाजणांना आणि 353 कलमाखाली चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस टप्प्याटप्प्यानुसार अटकेची कारवाई करणार आहेत.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली