आयनल मध्ये नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद

महिलांची डोक्यावर घागर, हंडे घेऊन ग्रामपंचायतवर धडक

ग्रामसभेत जोरदार झाली खडाजंगी

कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी,रोहीलेवाडी येथे २२ जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का? अशी विचारणा महिलांनी केली त्यावर सरपंच , उपसरपंच यांनी पंप जळाला असल्याने सबंधित खात्यावर दुरुस्तीसाठी पैसे नाहीत , असे सांगितले. त्यावर महिलांनी आक्रमक भुमिका घेतल्याने ही सभा वादळी ठरली. अखेर सरपंच सिद्धि दहिबांवकर यांनी येत्या 5 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच खोट्या प्रसिध्दी साठी विरोधकांची स्टंटबाजी केल्याचा आरोप उपसरपंच विलास हडकर यांनी केला आहे.
आयनल ग्रामपंचायत येथे सरपंच सिध्दी दहिबांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला उपसरपंच विलास हडकर, चेअरमन चिंदरकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र साटम, माजी सरपंच बापू फाटक, भाई साटम , उत्तम ओटवकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
या ग्रामसभेत नुतन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला तसेच विविध विकास कामांवर चर्चा झाली. यादरम्यान पाणी पुरवठा 22 जानेवारी पासून होत नसल्याबाबत होत नसल्याबाबत मुद्दा महिलांनी मांडला.त्यावर सरपंच उपसरपंचांनी समाधान कारक उत्तर न दिल्यामुळे महिला आक्रमक झाल्या महिलांनी या कारभाराबाबत रिकामी पाण्याची भांडी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आणून निषेध केल्याची माहिती माजी सरपंच बापू फाटक यांनी देत ग्रामपंचायतच्या सत्ताधा-यांना नागरिकांना पाणी पुरवठा करता येत नसल्याचा आरोप केला.पूर्वीच्या काळात माझ्या कारकीर्दीत पाणी बिलांवर आम्ही नळयोजना चालवली होती.त्या काळात संपूर्ण कामगार वेतन आणि लाईट बिल थकीत पूर्ण रक्कम आम्ही भरत होतो.आताच तुम्हाला ही नळयोजना परवडत नाही,असा सवाल माजी सरपंच बापू फाटक यांनी केला आहे.तसेच जर नळयोजनेबाबत अडचणी असल्या तर आम्ही मार्ग काढला असता, गावातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. ही आमची भुमिका आहे. महिलांनी जे आंदोलन केले ते योग्यच आहे असेही श्री. फाटक म्हणाले.

 पुर्वीच्या सत्ताधा-यांनी योग्य नियोजन न केल्यामुळेच ग्रामपंचायतवर ही वेळ – उपसरपंच विलास हडकर

आयनल ग्रामपंचायत नळयोजना एक पंप जळाल्यामुळे पाणी पुरवठा राहिलेवाडी व मणेरवाडी पाणीपुरवठा खंडित आहे. तर गावठणवाडी दुस-या पंपावर पाणी पुरवठा चालु होता. जळालेल्या पंपाच्या दुरुस्तीसाठी सुमारे सत्ताविस हजार एवढा खर्च अपेक्षित होता. मात्र संबधित नळपाणी योजनेच्या खात्यावर 8 हजार एवढीच शिल्ल्क आहे. या नळयोजना कामगाराचा पगार गेले 5 महिन्यांचा बाकी आहे. मणेरवाडी येणा-या पाण्याची पाईपलाईन 40 वर्षापूर्वीची सिमेंटची असून ब-याच ठिकाणी लिकेज आहे. नळपाणी योजनेचे लाईट बिल सरासरी 10 हजार पर्यंत येते. आताची वीज बिलाची थकीत रक्कम 68 हजार आहे. फक्त 83 नळग्राहक असुन पाणीपट्टी मागील सरपंचांनी दरमहा 150 रुपये ठेवली असून त्याची जमा 12,450 रुपये एवढी रक्कम होते. त्यातही पाणीपट्टी किमान 15 ते 20 लोकांची प्रत्येकी 2 हजार पेक्षा जास्त बाकी आहे. त्यामुळे योजना चालवण्याबाबत कोणताही ताळमेळ बसत नाही . यापूर्वी पंप बिघडला तर अधिकचे पंप होते. ते 2 पंप माजी सरपंचांनी लिलावात काढले त्यामुळे तातडीने पाणी चालु करताना पंप दुरुस्तीसाठी आर्थिक अडचण ग्रामपंचायतला आलेली आहे. त्यामुळे येत्या 4 दिवसांत सुरळीत करण्यात येईल. मात्र विरोधकांनी आपल्या अपयशाचे पाप झाकण्यासाठी खोट्या प्रसिध्द साठी स्टंटबाजी केल्याचा आरोप उपसरपंच विलास हडकर यांनी केला.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!