कणकवली कॉलेज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

कणकवली/मयुर ठाकूर

       कणकवली कॉलेज कनिष्ठ विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक ए. पी. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा.  के. जी जाधवर,  प्रा. व्ही. आर. सावंत, प्रा.  एम.व्ही. महाडेश्वर, प्रा. हरिभाऊ भिसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय सावंत, प्रा. व्ही. एस सावंत, प्रा. पी. एम सावंत, प्रा. एस. एस. ढवळे ,प्रा.  एस. जी सावंत,  प्रा. एम. जे. कांबळे उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप साळुंखे आपल्या भाषणात म्हणाले, तरुण पिढीने इतिहासाचा मागे वळून धांडोळा घ्यावा या उद्देशाने असे कार्यक्रम आयोजनाचा उद्देश असतो.  सर्व जगात अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून मान्यता पावलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजे भारताच्या इतिहासातील तळपता ताराच म्हणावा लागेल.  तसेच आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अनेक थोर नेते होऊन गेले त्या सर्वांच्या तुलनेत महात्मा गांधींचे व्यक्तित्व लोकविलक्षण व वैशिष्ट्यपूर्ण आहे.  पर्यवेक्षक प्रा. ए. पी चव्हाण म्हणाले,  महात्मा गांधींनी जनतेच्या समस्या ऐकून त्या लोकशाही मार्गाने सोडविल्या. त्यासाठी शांततेचा आणि संयमाचा मार्ग पत्करला. महात्मा गांधींच्या विचारात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे हे दिसून येते. गरिबांना  रोजगार मिळाला तरच अर्थव्यवस्था भक्कम होईल असे मत त्यांनी मांडले.
     जिल्हा समनव्यक प्रा. के. जी जाधवर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांमध्ये दोन्ही नेत्यांच्या विचारांची सांगड असली पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी स्वयंसेवकांनी कंबर कसली पाहिजे. प्रा. व्ही. आर. सावंत यांनी महात्मा गांधींचे बालपण, शालेय जीवन व स्वातंत्र्य चळवळीतील

योगदान या विषयी सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले, महात्मा गांधीं आई व वडील यांच्या संस्कारातूनच ते घडले. वडिलांचा सत्यप्रिय, धीट, उदार व आईचा धार्मिक, करारी, प्रामाणिक, दृढनिश्चयपणा हा स्वभाव गांधीजींच्या विचारात दिसून येतो. महात्माजींच्या जीवनाचे तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयांनी अंगी बाणवले पाहिजे. प्रा. एम. व्ही महाडेश्वर यांनी लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण, शालेय जीवन,शिक्षण, पदव्या, विचार, देशासाठी योगदान व कारकीर्द याविषयी सविस्तर विवेचन केले.
प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे यांनी १ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांनी राबविलेली स्वच्छता मोहीम व आजच्या कार्यक्रमातील घेतलेला पुढाकार याविषयी त्यांचे विशेष कौतुक केले. देशाच्या प्रगतीसाठी सर्वंकष व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना महत्त्वाची आहे. शास्त्रींच्या आयुष्यातील काही बोलके प्रसंग त्यानी उभे केले. माणसांच्या उंचीपेक्षा त्याच्या विचाराची उंची महान असली पाहिजे असे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तेजस नेवरेकर, प्रीती परब ऐश्वर्या सडेकर, विभा हडकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी उषा पवार तर आभार कुमार योगेश जावडेकर यांनी मांनले. कार्यक्रमासाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!