शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश
मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक यांचे स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या होत्या. यामध्ये मेडिकल कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भरणा केलेले विद्यापीठ शुल्क व अनामत रक्कम शासन खात्यावर न भरणा करता परस्पर वैयक्तिक खात्यावर स्वीकृत करून अपहार करण्यात आला होता. यामुळे विद्यापीठाचे शुल्क निर्धारित वेळेत जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. यासंदर्भात पुराव्यांनीशी दाखल तक्रारीवर वरिष्ठ स्तरावरून प्राथमिक चौकशीची कार्यवाही करण्यात आलेली होती. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांच्या फ्रीमध्ये घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या निर्देशांमुळे संचालकांनी वैद्यकीय अधिष्ठातांना फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम फुसांडे यांचेवर 4 लाख 32 हजार 250 रुपये रक्कमेच्या अपहार प्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कुडाळ