गणेशोत्सवात भाविकांना सोयी सुविधा द्या – शंकर बर्गे 

गणेशोत्सव आढावा बैठक 

ब्युरो । सिंधुदुर्ग :  गणपती उत्सवानिमित्त विविध ठिकाणांहून नागरिक जिल्ह्यात येत असतात. या काळात भाविकांना सुविधा देत त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्‍सव पुर्व तयारीच्या अनुषंगाने संबधित विभागाचे अधिकारी व तालुका शांतता समितीचे सदस्य यांची एकत्रित बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री  निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच सरपंच दीपक तोरस्कर, शांतता समिती सदस्य सारिका रहाटे , पत्रकार अभिमन्यू लोंढे .गजानन वाघरे, वसंत महादेव तांडेल, उमेश भगवान शृंगारे, नम्रता नितीन कुबल, रफिक गुडू शेख, अशोक पाडावे, विलास कुडाळकर,  निसार अहमद शेख, मिलिंद वसंत नाईक,.सचिन गावडे उपस्थित होते.
         श्री बर्गे म्हणाले, जिल्हा व तालुका पातळीवर स्थापन करण्यात आलेले आपत्ती नियंत्रण कक्ष गणेशोत्सवाच्या कालावधीत 24 तास कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपले क्षेत्रातील उपविभागीय पोलीस अधिकारी/ पोलीस निरीक्षक यांचेशी समन्वय साधून गणेश मंडळ, शांतता समितीची बैठक घेवून गणेशोत्सवाबाबत आवश्यक त्या सूचना देवून कार्यवाही करावी, रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्‍यात यावीत, रस्त्यांची डागडुजी गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी, गणेशोत्‍सव काळात येणा-या भक्‍तगणांचे आरोग्‍य विषयक तपासणी होणे आवश्‍यक आहे. संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेता आपत्कालीन आरोग्य पथक तयार ठेवण्यात यावीत, सदैव विद्युत वितरण विभाग कार्यान्वीत राहील यादृष्टीने पूर्व नियोजन करावे, दुरध्‍वनी व्‍यवस्‍था कोलमडणार नाही याची दक्षता घ्‍यावी, वाहतुकीच्या सोयीसाठी एस.टी बसचे नियोजन करून आवश्यकत्या प्रमाणे वाहने उपलब्ध करुन द्यावेत, गणेश चतुर्थी निमित्‍त येणारे व परत जाणारे प्रवासी यांचेसाठी जादा गाड्यांची उपलब्‍धता याबाबत नियोजन करुन प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय होणार नाही यादृष्‍टीने नियोजन करावे असेही श्री बर्गे यांनी सांगितले.
    पोलिस अधिक्षक श्री. अग्रवाल म्हणाले, गणेश विसर्जनाचा मार्ग पोलीस विभागाशी समन्वय साधून निर्गमित करावा,  अग्निशामक वाहन अद्यावत व सुस्थितीत ठेवावे, बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानात ग्राहकासाठी मोदक, मिठाई व अन्य खाद्य पदार्थ ठेवण्यात येतात. या पदार्थांची तपासणी करून भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही या दृष्टीने विशेष पथके तैनात करण्यात  यावीत,  खाजगी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही यासाठी  राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर बंदोबस्‍त ठेवण्‍यात यावा, अवैध वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, जादा भाडे आकारण्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, सार्वजनिक गणेश मंडळाना ध्‍वनी प्रदुषणाची व्‍यवस्थित माहिती देण्‍यात यावी, रहदाराची ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, कायदा व सुव्‍यवस्‍थेचे दृष्‍टीने फिरती पोलीस पथके नियुक्‍त करण्‍यात यावीत. आवश्‍यकते प्रमाणे प्रवाशांना गैरसोय वा त्रास होणार नाही यादृष्‍टीने तपासणी करण्‍यात यावी, वाहतुकीस अडथळा होणारी घटना घडल्यास क्रेन व जेसीबीच्या मदतीने दूर करण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून करावी, सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा, जिल्‍ह्यात संपूर्ण महामार्गावर अपघात झाल्‍यास 108 क्रमांक रुग्णवाहिका सुस्थितीत उपलब्‍ध ठेवण्याच्या व अपघात स्थळी रुग्णवाहिका वेळेत पोहचतील याबाबत नियोजन   करणेच्या तसेच दहीहंडीच्या ठिकाणी जवळच परंतु मोकळ्या जागेत रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणेच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी तसेच सरपंच, पोलिस पाटील यांनी देखील सूचना केल्या.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!