कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसूरकर यांची निवड
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले नियुक्तीपत्र
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहराच्या शहरप्रमुख पदी कणकवलीतील प्रमोदशेठ मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या शहरप्रमुख पदी निवड करण्यात आलेली असताना श्री. मसुरकर यांच्याकडे शहरातील 4 प्रभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत व उपनेते अरुण दुधवडकर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी श्री. मसूरकर यांना दिले आहे. या नव्याने दिलेल्या जबाबदारीमध्ये श्री. मसुरकर यांच्याकडे प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 13 या कणकवली शहरातील प्रभागांची शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रमोद मसुरकर हे गेले अनेक वर्ष कणकवली शहराच्या शिवसेना उपशहर प्रमुख पदी कार्यरत होते. त्यांना या पदावर बढती देत असताना त्यांच्याकडून संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या कार्याचा या पदाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला आहे. या निवडीबद्दल श्री. मसूरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हे नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक, तेजस राणे, कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, मजुर फेडरेशनचे संचालक जयेश धुमाळे, एकनाथ कोकाटे आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली