पालघर भागात २२ जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता

नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासनाच्या सूचना

पालघर (ब्यूरो न्यूज) – १८ जुलै २०२३ रोजीच्या भारतीय हवामान विभाग यांचेकडील हवामान विषयक पूर्वसूचनांनूसार दिनांक २२ जुलै, २०२३ पर्यंत पालघर जिल्हयामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आॅरेंज आणि रेड अलर्टच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

या कालावधीत समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जावू नये. तसेच अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता राहिल. समुद्रास असणारी भरती,
अतिवृष्टी, व धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग यामुळे पूरप्रवण, सखल भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरुन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच कमी वेळेत अतिवृष्टी होत असल्याने दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे दरड व पूरप्रवण भागांतील नागरिकांनी अतिवृष्टीचा इशारा
लक्षात घेऊन सतर्क रहावे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, त्याचप्रमाणे जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसिल कार्यालय / पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२५२५-२९७४७४ / ८२३७९७८८७३ व अथवा टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!