शेकडो भाविकांच्या उपस्थितीत काळसे येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न
आ.अनिल परब,आ. सुनिल प्रभु,आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन
श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार
मालवण : मालवण तालुक्यातील काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊली मंदिराचा कलशारोहण आणि श्री गणेश व श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती स्थापना सोहळा आज शुक्रवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी हजारो भाविकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला काळसे गावचे सुपुत्र माजी मंत्री तथा आमदार अनिल परब ,आमदार सुनील प्रभु, आमदार वैभव नाईक,शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी कलशारोहण सोहळ्यात सहभागी होऊन देवी माऊलीचे दर्शन घेतले. श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देउन मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या सोहळयाला काळसे गावातील गावकरी,मानकरी,पालटदार,सेवेकरी,पुरुष,महिला ग्रामस्थ,माहेरवाशीणी आणि अबालवृद्ध भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
याप्रसंगी आमदार अनिल परब म्हणाले, काळसे माझे मुळ गाव असून देवी माऊली आमची कुलदेवता आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक अडचणीच्या प्रसंगामध्ये माझ्या हाकेला धावून येत देवी पाठीशी उभी राहिली आहे. हे मंदिर उभारण्यासाठी गावातील सर्व लोकांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार त्यांनी व्यक्त करत भक्तांवर असाच आशिर्वाद ठेवण्याची प्रार्थना देवीचरणी केली.
आमदार सुनिल प्रभु म्हणाले, श्री देवी माऊलीचा कलशारोहण सोहळा धार्मिक कार्यक्रम असून कुटुंबोत्सव म्हणून साजरा होत आहे , अनिल परब साहेबांचे सर्वात मोठे योगदान मंदिर उभारणीत आहे. गावातील दोन सुपुत्र एक कॅबिनेट मंत्री अनिल परब आणि एक मी आम्हाला राजकीय क्षेत्रात उच्च पदावर जाण्याचे भाग्य लाभले. गावचे सुपुत्र म्हणून तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच . त्यांच्या आशिर्वादामुळेच आम्ही एवढे कार्य पार पाडू शकतो. आपल्या गावात महाविद्यालय व्हाव हे स्वप्न सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण केले. त्यामुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण गावातच मुलांना मिळत आहे. देवी माऊली मंदिर उभारणीत गावच्या प्रत्येक कुटुंबाने जे योगदान दिले आहे त्यांचे त्यांनी आभार मानले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार भूमीपूजन आणि कलशारोहण या दोन्ही सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आमदार अनिल परब आणि आमदार सुनिल प्रभु आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने देवीचे सर्वांग सुंदर मंदिर आज उभे राहिले आहे. आपल्या गावचे नेतृत्व जेव्हा मोठ होतं त्याचा फायदा आपल्या गावाला कसा आणि किती होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी मंत्री आमदार अनिल परब आणि माजी महापौर आमदार सुनिल प्रभु हे आहेत. त्यांनी गावच्या विकासात दिलेले योगदान मोठे आहे. मंदिर परसरातील विहीर आणि सुशोभीकरण या कामांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळी स्थापित देवतांचे प्रात: पूजन ,देवता स्थापन विधी , अग्निस्थापना हवन हे विधी पुरोहितांच्या उपस्थितीत यजमान जोडप्यांच्या हस्ते स्थापन झाल्यानंतर प्रमुख अतिथी प. पू. स्वामी विपाप्मानंद , यांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व कलश घेऊन माऊली मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली यामध्ये प. पू. स्वामी विपाप्मानंद ,यांच्या समवेत काळसे गावचे सुपुत्र माजी मंत्री तथा आमदार अनिल परब , सौ. सुनिता परब , सौ. सायली सुनिल प्रभु , अंकित सुनिल प्रभु , जीर्णोद्धार समिती अध्यक्ष श्री अनिल प्रभु ,सौ. अनघा प्रभु , श्री समीर प्रभु , विनोद गोसावी यांच्यासह गावातील सर्व मान्यवर व्यक्ती आणि शेकडो महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिराला पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर प. पू. स्वामी विपाप्मानंद ,ग्रामपुरोहीत उदय गोगटे,आमदार सुनील प्रभु यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. त्यानंतर इतर कलशही गावकरी मानकरी यांच्या हस्ते चढविण्यात आले. त्यानंतर श्री अनिल प्रभु यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची आणि श्री समीर प्रभु यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी मुंबईचे उपविभाग प्रमुख अवी परब , माजी नगरसेवक मनमोहन चोणकर ,राजेश्वर वायंगणकर , राजू धुपकर , निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी , कै. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परब, यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती लावून देवी मातेचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. अनिल प्रभु , सेक्रेटरी विजया परब , खजिनदार गणेश प्रभु , संपर्क प्रमुख उमेश प्रभु, प्रमुख सल्लागार श्री मंगलदास प्रभु यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देउन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल परब , आमदार सुनिल प्रभु , आमदार वैभव नाईक , संदेश पारकर , मनमोहन चोणकर , हेमंत परब , अंकित प्रभु , विनोद गोसावी,बाळ महाभोज, कमलाकर गावडे,अण्णा गुराम आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच कै. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानच्या वतीने मंदिर जीर्णोद्धारामधील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मंदिर जीर्णोद्धार समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ आणि संपूर्ण सोहळ्याचे सुत्रसंचालन संदिप माड्ये यांनी केले. संपूर्ण सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री देवी माऊली जीर्णोद्धार समिती आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच गावातील तरुणांनी व सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले .
प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण