सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवीन “संदेश”?

जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार गटात नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सक्रिय झाला आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या राज्याच्या राजकारणात नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद इतर ठिकाणी देखील दिसू लागले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी लवकरच नवीन एका अनुभवी नेत्याची वर्णी लागण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. यापूर्वी या पक्षात काम केलेल्या डॅशिंग नेत्याने बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आपल्या राजकीय हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु आता थेट सत्तेत सहभागी होता येणार असताना ज्या पक्षात सध्या तो नेता आहे त्या पक्षाची अवस्था सध्या ना घर का ना घाट का अशी झालेली आहे. सध्या असलेल्या पक्षामध्ये केवळ पद देण्याची घोषणा केली परंतु अद्याप नियुक्ती जाहीर झाली नसल्याने गेले काही महिने नाराज असलेल्या या नेत्याकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा “संदेश” दिला जाण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला जिल्हाध्यक्ष पदाकरिता अपेक्षित असा चेहरा सापडल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय गोटात सुरू आहे.
दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग





