निराधार वंचित ,मनोरूग्ण बांधवांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे – संदिप परब,संस्थापक सचिव – जीवन आनंद संस्था

रविना खंडारे या गोवा येथे सापडलेल्या मुंबईतील मानसिक रूग्ण युवतीचे कुटुंबामधे पुनर्मिलन
जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुगलद्वारे शोधले रविनाचे कुटुंबिय
सांताक्रुज – जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित, मनोरूग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ८ महिन्यांपुर्वी वेडाच्या भरात मुंबईतून गोव्यात गेलेल्या रविना खंडारे (वय २४ ) या मानसिक रूग्ण युवतीचे कुटुंबियांचा गुगलद्वारे शोध घेवून तिचे नुकतेच पुनर्मिलन घडवून आणले. संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांनी यावेळी बोलताना ,”देशातील शहरांत शारिरीक आणि मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेले रस्त्यांवरील असंख्य निराधार, वंचित व्यक्ती हे आपले बांधव आहेत.त्यांचेकडे जाणिवपुर्वक लक्ष देवून त्यांना सुरक्षित स्थळी पोहचविणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.” असे म्हटले.
जीवन आनंद संस्थेचे निराधार वंचितांच्या कार्या अंंतर्गत सांताक्रुज (मुंबई), विरार (पालघर) पणदूर-अणाव व किन्लोस (कुडाळ सिंधुदुर्ग) व गोव्यातील म्हापसा व ओपा खांडेपार येथे आश्रम आणि शेल्टर होम आहेत.
म्हापसा पोलिस स्टेशनच्या LPSI रिचा भोसले यांनी १९ नोव्हेंबर,२०२२ रोजी रविना खंडारे (वय २४) हिला म्हापसा येथून निराधार व गंभीर मानसिक रूग्णावस्थेत (हायपर) ताब्यात घेवून जीवन आनंद संस्थेच्या म्हापसा येथील संवेदना आश्रमात दाखल केले.
गेले सहा-सात महिने म्हापसा येथील संवेदना आणि नंतर कुडाळ सिंधुदुर्ग येथील संविता आश्रमातील उपचाराने हळूहळू रविनाची मानसिक प्रकृती ठिक झाली. तीने आश्रमातील सेवक कार्यकर्त्यांना तिच्या यवतमाळ जिल्ह्यातील पळशी ता.दारवहा या गावाचे नाव सांगीतले.
कार्यकर्त्याने गुगलद्वारे विविध प्रकारे प्रयत्न करून रविनाचे गावातील काकांशी संपर्क केला. काकांनी मुंबईतील कुटुंबियांचा नंबर दिल्यानंतर रविनाचा तिच्या भावाशी राज खंदारें यांचेशी संपर्क झाला.
आज जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांचे उपस्थीत वाकोला सांताक्रुज पुर्व येथील कार्व्हर डे नाईट शेल्टर येथे रविना हिची ओळख पटवून तिचे भाऊ राज खंडारे यांचे ताब्यात देण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, प्रसाद आंगणे, लिना पालकर हे कार्यकर्ते उपस्थीत होते.
किसन चौरे,कोकण नाऊ,ब्यूरो न्यूज





