शिक्षण सेवक मानधनासाठी २५ हजार रुपये
शून्य शिक्षकी शाळा: उद्योजक सुरेश गवस यांच्याकडून शिवसेनेला हातभार
दोडामार्ग l प्रतिनिधी
तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळेतील शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्पुरत्या मानधन तत्वावर शिक्षण सेवक नियुक्त करण्याच्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपक्रमाला मूळ भिकेकोनाळ येथील व सध्या पुण्यात राहत असलेल्या सुरेश गवस यांनी आर्थिक मदत केली. त्यांनी २५ हजार रुपये कुंब्रल रुमडाची गोठण (शाळा क्र.३) येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या शिक्षण सेवकासाठी मानधन म्हणून ती रक्कम दिली आहे.
तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत तब्बल १३ शाळा शून्य शिक्षकी आहेत, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मदत व प्रयत्नातून अनेक शाळात शिक्षण सेवक नेमून त्या शाळा सुरू ठेवण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या त्या प्रयत्नाला आता स्थानिक मात्र उद्योगधंद्या निमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थ साथ देत आहेत.उद्योजक सुरेश गवस यांनी या उपक्रमाला साथ दिली.
श्री. गवस यांना शिक्षणाविषयी तळमळ आहे . आपण लहान असताना त्यावेळी हाती पैसा नव्हता; मात्र आता कुणाला मदत करू शकतो एवढी शक्ती देवाने दिली आहे. आपल्या गावातील, तालुक्यातील मुले पैशाअभावी अशिक्षित राहता नये यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे श्री.गवस यांनी सांगितल्याचे सांगितल्याचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सांगितले आणि खारीचा वाटा उचलल्याबद्दल श्री.गवस यांचे आभार मानले.