मोटर वाहन निरीक्षकांचा अवैध, बेकायदेशीर वाहतुकीला दणका!

आज दिवसभरात कणकवलीत एक टेम्पो ट्रॅव्हलर, जेसीबी वर केली कारवाई
जून महिन्यात तब्बल 57 वाहनांवर कारवाई
सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक यांच्या कडून कणकवलीत आज दोन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एक सकाळच्या सत्रात एक टेम्पो ट्रॅव्हलर्स तर सायंकाळच्या सत्रात एका जेसीबीचा समावेश आहे. दहा वर्षांचा टॅक्स न भरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे यांनी दिली. आरटीओ कार्यालया कडून गेले काही दिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत असून जून महिन्यात आतापर्यंत एकूण वेगवेगळ्या कलमान्वये एकूण 57 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री. पोलादे यांनी दिली. कणकवलीत आज सकाळच्या सत्रात टेम्पो ट्रॅव्हलर्स च्या चालकाकडे परमिट व बॅच नसल्यामुळे केलेल्या कारवाईत 20 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर सायंकाळच्या सत्रात जेसीबी वर दहा वर्षांचा टॅक्स न भरल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री पोलादे यांनी दिली. ही कारवाई श्री पोलादे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अभिजीत शिरगावकर यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली