दीड महिन्याच्या मागणीनंतर हरकुळ धरणाचे पाणी जानवली पात्रात पोचले

शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत केली होती मागणी
नदी लगत गावांच्या नळ योजनांना दिलासा मिळणार
हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याबाबत गेले दीड महिन्याहून अधिक काळ सातत्याने मागणी करून देखील जानवली नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडले जात नव्हते. दरम्यान चार दिवसापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली तहसीलदार आर जे पवार यांची भेट घेत पाणी सोडण्या बाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर तहसीलदार श्री. पवार यांनी याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले होते. तसेच 19 मे रोजी जानवली नदीपत्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडल्याचे सांगितले होते. मात्र हे सांगितल्यानंतरही नदीपात्रात पाणी पोहोचले नव्हते. अखेर आज सोमवारी सकाळी नागवे व साकेडी भागातील परीठ कोंड या नदीपत्रात हरकुळ धरणाचे पाणी आल्याने अखेर गेल्या कित्येक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे. या भागातील नदी पात्र कोरडी पडल्याने नदी लगतच्या नळयोजना बंद झाल्या होत्या. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत होता. हे पाणी तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून तहसीलदार कार्यालयावर धडक दिल्यानंतर काहीच दिवसात हे पाणी नदी मात्र देऊन पोहोचले. हे पाणी जानवली गणपती साना या ठिकाणी येऊन पोहोचण्याकरिता अजून तीन ते चार दिवस जाण्याची शक्यता आहे. जानवली नदीपत्रातील या पाण्यामुळे तूर्तास करंजे, साकेडी, नागवे या गावांच्या नळ योजनांना दिलासा मिळणार आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली