आपत्ती नियंत्रण कक्षातील फोन बंद

दोडामार्ग तहसील:, तालुकावासीयांनी संपर्क कसा करायचा?

प्रतिनिधी l दोडामार्ग
येथील तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षामधील लँडलाईन फोन बंदावस्थेत आहे. खरे तर तो कक्ष मॉन्सून व मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेऊन एक जून पासून कार्यान्वित केला जातो. नैसर्गिक आपत्तीची सूचना सर्वसामान्यांना प्रशासनाला देता यावी आणि प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केली जावी यासाठी तो कक्ष चोवीस तास कार्यरत असतो. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तो फोन चोवीस तास चालू असणे आवश्यक असले तरी, आज ११ तारीख उजाडली तरी तहसीलमधील लँडलाईन फोन बंदच आहे.
तालुक्यात शनिवारी (ता.१०) सायंकाळी भरपूर पाऊस पडला. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान पुन्हा गडगडाटासह सुरू झालेला पाऊस तासभर सुरू होता. विजेच्या गडगडाटाने सारा आसमंत दणाणून सोडला होता. तेव्हा मोठा आवाज झाल्याने कुठेतरी वीज पडली असण्याची शक्यता होती. त्यामुळे सकाळपासून तहसीलमधील दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु होता; मात्र तो दूरध्वनी बंद असल्याचे लक्षात आले.
त्यासंदर्भात तहसीलमधील एका जबाबदार अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी तो दूरध्वनी बंद असल्याने नवा दूरध्वनी जोडून देण्याची मागणी बीएसएनएलकडे केल्याचे सांगितले.फोन तातडीने सुरु करण्याची सूचना बीएसएनएलच्या श्री. माने यांना केली आहे. नवा नंबर मिळताच तालुकावासीयांसाठी तो नंबर जाहीर केला जाईल असेही ते म्हणाले.

महसूल यंत्रणा सुशेगाद

जिल्हाधिकाऱ्यांनी बीपरजॉय चकीवादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, महसूल यंत्रणाच दोडामार्ग तालुक्यात सुशेगाद असल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!