मुख्यमंत्र्यां समोरच राणे, केसरकरांमधील “हा” प्रसंग ठरला लक्षवेधी!

एकेकाळच्या कट्टर विरोधकांमधील मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलणार?
जिल्ह्यातील राजकारणात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम टर्निंग पॉईंट ठरणार?
काही वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मात्र आज ते एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर राजकारणात एकमेकांना एकेकाळी नजरेने न पाहणारे राणे व केसरकर यांच्यातील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच व्यासपीठावरील एक घटना सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कुडाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याकरता दाखल झाले. मान्यवरांची भाषणे झाली व त्यानंतर मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाचआपले भाषण आटोपून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या आसन व्यवस्थेवर बसल्यावर पिण्यासाठी पाणी देण्याचा इशारा केला. मात्र हा इशारा पाहून व्यासपीठावर बसलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व एकेकाळी राणेंचे कट्टर विरोधक असणारे दीपक केसरकर यांनी स्वतः राणेंच्या बाजूच्याच व्यासपीठावरील खुर्चीवरून उठून समोरील टेबलावर भरलेले पाण्याचे ग्लास हाती घेऊन राणेंना दिले. केसरकर यांच्या या राणे प्रेमाने मात्र व्यासपीठावरिल काहींच्या गालात न कळत हसू आले. तर व्यासपीठासमोर बसलेल्या अनेकांच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटली नाही. त्या नंतर राणे व केसरकर हे अनेकदा अगदी कानात बोलतानाचे चित्र देखील सर्वांनीच पाहिले. त्यामुळे या घटने मुळे जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय घडामोडींची ही नांदी म्हटली तर कदाचित ते चुकीचे ठरू नये.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग