सुपीक गाळ शेतात नेऊन उत्पादन वाढवा

प्रशांत पानवेकर: शिरवलमध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार कार्यक्रम

दोडामार्ग : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही शासनाची अतिशय चांगली योजना आहे. धरणातून काढण्यात येणाऱ्या गाळातून सुपीक गाळ शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांच्या शेतात न्यावा .जेणेकरून शेती उत्पन्नात वाढ होईल. तसेच धरणातील पाणी पातळी वाढेल आणि याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल, असे मत प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी व्यक्त केले.
नितीन सावंत म्हणाले, शिरवल धरण सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधले. या धरणात अमाप गाळ साचला आहे. सध्या शासनाची चालू असलेल्या योजनेचा शेतकऱ्यांनी पुरेपूर वापर करून घेत येथील सुपीक गाळ त्यांच्या शेतात न्यावा. यासाठी शासनाकडून हेक्टरी अनुदानही दिले जाणार आहे. येथे राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा.
कुंब्रल गावातील शिरवल धरणावर गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंधारण विभागाचे उप अभियंता आर.टी. धोत्रे, स्थापत्य अभियंता तुषार यादव, जिल्हा प्रकल्प समन्वयक नितीन सावंत, सरपंच सुजल गवस, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीराम गवस, प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमाला कुंब्रल व शिरवलबाग येथील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!