ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियमचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शरद गरुड स्मृती पुरस्कार भजनी कलाकार भालचंद्र केळुसकर यांना प्रदान

ओमप्रकाश चव्हाण, विजय पालकर, किरण खोत, उमेश गाळवणकर कोकणरत्न पुरस्कारने सन्मानित

ठाकर समाज वधू-वर सूचक मेळाव्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश जोशी । कुडाळ : ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीचा १७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पिंगुळी येथे दि. ३ मे २०२३ रोजी पार पडला. सकाळच्या सत्रात वधु-वर सूचक पालक मेळावा तर सायंकाळी शरद गरुड स्मृती कला पुरस्कार आणि कोकण रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सकाळचे सत्रात ठाकर समाजाचा वधु वर सुचक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास ठाकर समाजातील वधु वरांनी नोंदणी करणेकामी उपस्थिती दाखविली. सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर, पद्मश्री परशुराम गंगावणे, पिंगुळी ग्रा.प सरपंच अजय आकेरकर, मोहन होडावडेकर, भगवान रणसिंग, प्रकाश पांगुळ, मनिषा मस्के, चेतन गंगावणे, दादा मसके इ. उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे वतीने देण्यात येणारा शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२३ ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुसकर यांना प्रदान करण्यात आला. भजन क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने या वर्षी दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण, पत्रकार विजय पालकर, किरण खोत, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांना कोकणरत्न सन्मान २०२३ हा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. नवनिर्वाचित पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार संस्था अध्यक्ष पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आला. सावली ग्रामसंघ मधील स्वयंसहायता समुह यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन वैभव खानोलकर यांनी केले. प्रास्ताविक एकनाथ गंगावणे यांनी केले. रात्री ठिक १०.०० वाजता तेडोलकर दशावतार नाट्यमंडळ झाराप यांचे पुण्यप्रभाव हे नाटक सादर करण्यात आले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!