महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गात मेणबत्ती क्लस्टर उभारणार !

फाईन आर्टिस्ट नंदिनी रामचंदानी यांची कुडाळ येथे घोषणा
महिला रोजगार प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेणबत्ती निर्मितीचा क्लस्टर उभारण्यात येईल, असे प्रतिपादन फाईन आर्टिस्ट आणि क्राफ्ट ट्रेनर सौ. नंदिनी रामचंदानी यांनी कुडाळ येथे केले.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती व रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांसाठी दोन दिवसीय विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कुडाळ येथील शिवाजीनगरमधील दैवज्ञ समाज भवन येथे करण्यात आले होते. या शिबिरात नाशिकच्या सौ. नंदिनी रामचंदानी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नंदिनी रामचंदानी म्हणाल्या की, कोकणातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेऊन त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांसाठी बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, यावर भर देणे आवश्यक आहे. महिलांनी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मेणबत्ती निर्मितीच्या क्लस्टरच्या उभारणीच्या दिशेने वाटचाल करावी. यासाठी आपले निश्चितच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही रामचंदानी यांनी स्पष्ट केले.
विविध हस्तकला व उत्पादनांचे प्रशिक्षण
या दोन दिवसीय शिबिरात फॅब्रिक पेंटिंगअंतर्गत कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रशचा वापर, विविध चित्रकला तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, रंगांचे मिश्रण, शेडिंग तसेच कापडावरील रंग दीर्घकाळ टिकण्यासाठी आवश्यक पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात आले.
याशिवाय रेझिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम, आरती थाळी, पिलर व स्तंभाकार मेणबत्त्या, फॅन्सी दिवे, लाडू मेणबत्त्या आणि सुगंधी जार मेणबत्त्या तयार करण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी आश्रय प्रतिष्ठानचे माधव गोरे, मणिकर्णिका संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरूट, श्री. दाभोलकर, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, प्रियांका सुकाळे, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मंगेश राऊत, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, वृंदा राऊत, गोविंद जळवी, दीपेश मांजरेकर, हरेश घाडी, दुर्वांकुर घाडी आणि ओंकार पाटील आदी उपस्थित होते.
महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.






