पाट हायस्कूलच्या कथक नृत्यवर्गात नटराज पूजन

विद्यार्थिनींना घुंगरूंचे वाटप
कै. मा. एकनाथजी ठाकूर कला अकादमीचा उपक्रम
पाट हायस्कूलमधील कै. मा. एकनाथजी ठाकूर कला अकादमीच्या वतीने आयोजित कथक नृत्यवर्गात श्री नटराज पूजन करण्यात आले. यावेळी कथक नृत्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना घुंगरूंचे वाटप करण्यात आले.
पाट हायस्कूलमध्ये कला अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध कलाविषयक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळत आहे. कलाविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये वाढीव गुणांचा लाभही मिळतो.
नृत्यकलेमुळे शरीराचा लवचिकपणा वाढण्यास, मानसिक स्वास्थ्य जपण्यास आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे जागरूक पालक आपल्या मुलांना नृत्यवर्गात सहभागी करून घेत आहेत. या वर्गातील विद्यार्थी गावातील विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असून, त्यांच्यातील कलागुणांमुळे त्यांची स्वतंत्र कलाकार म्हणून ओळख निर्माण होत आहे.
कला अकादमीतील घुंगरू वितरण कार्यक्रमात अन्वी परब, स्पृहा नाईक, चार्वी निवतकर, स्नेहल मेस्त्री आणि भक्ती तेली-कोचरेकर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. त्यांना स्नेहंकता सुधीर हडकर आणि भार्गवी सुनील राणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी कलाशिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कला अकादमीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणासोबत एखादी कला जोपासावी आणि आपल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






