बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत शारदोत्सवातून उलगडला प्राचीन कोकणच्या कृषी संस्कृतीचा वारसा

सरस्वती पूजनाच्या मखरात ग्रामीण घराचा देखावा आणि भारतीय वाद्यांच्या प्रतिकृती
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे शारदोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी प्राचीन कोकणच्या कृषी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले. नर्सिंग महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय आणि सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभागातून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सरस्वती पूजनाची आकर्षक सजावट साकारण्यात आली.
या शारदोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भजन, कीर्तन, पारंपरिक फुगडी, दांडिया आणि भक्तिगीतांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते सरस्वती पूजनासाठी उभारण्यात आलेले कोकणच्या प्राचीन कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारे मखर.
पारंपरिक वस्तूंमधून उलगडला कोकणचा सांस्कृतिक वारसा
इतिहासकाळात शेतकरी जीवनात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंच्या आधारे ग्रामीण घराचा देखावा उभारण्यात आला होता. यामध्ये कंदील, पाटा-वरवंटा, जाते, डाळी, सुप, रवळी, टोपली, मुसळ, कुडू, शेर, भाताची मूडी, कांद्याची गाठण, तांब्या, तांब्याची कळशी आणि तांब्याचा हंडा अशा विविध वस्तूंचा समावेश होता.
गवताने शाकारलेली झोपडीवजा वास्तू, कुडाच्या भिंतींवरील वारली चित्रकला आणि पारंपरिक वस्तूंची मांडणी यांमुळे जुन्या कोकणी ग्रामीण जीवनाचे चित्र साकारले गेले. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील प्राचीन संस्कृती, कृषी परंपरा आणि पारंपरिक जीवनशैलीची ओळख व्हावी, या उद्देशाने कला शिक्षक प्रसाद कानडे यांच्या कल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला.
केळीच्या सोपांपासून साकारली भारतीय वाद्यांची प्रतिकृती
सत्यनारायणाच्या महापूजेसाठीही भारतीय वाद्यकलेची संकल्पना राबविण्यात आली. पर्यावरणपूरक केळीच्या सोपांचा वापर करून हार्मोनियम, तबला, पखवाज आणि ढोलकी यांच्या प्रतिकृती असलेले आकर्षक मखर तयार करण्यात आले होते. पारंपरिक कला आणि पर्यावरणपूरक सजावटीचा सुरेख संगम या माध्यमातून साधण्यात आला.
या संपूर्ण सजावटीची संकल्पना कला शिक्षक प्रसाद कानडे यांची होती. त्यांना विशाल सावंत, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, सुनील गोसावी, महादेव परब, श्याम नालंग, रजत गाळवणकर, संतोष पडते, संतोष मेस्त्री, सोनू सावंत, गजानन टारपे, मिलिंद धोंड आणि चेतन गवळी यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर यांचे या उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सजावटीचे पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.






