एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परुळेचा दर्शन सामंत जिल्ह्यात दुसरा

कुडाळ :
डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
दर्शन सुंदर सामंत या विद्यार्थ्याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याने ११६ गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. तसेच नूतन रमेश आमडोसकर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. याबरोबरच शोभा केशव मुंडये, नम्रता चंद्रकांत गोसावी व रुची भरत राऊळ या विद्यार्थिनींचीही गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना ५ वर्षांसाठी दरमहा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती मिळणार आहे.
याबरोबरच पियुष प्रशांत तोरसकर, तेजस यशवंत परब, राज रविंद्र माडये, वैष्णवी रमेश परुळेकर, वेदांत संदीप कांबळी, प्रज्वल प्रकाश करलकर व प्रज्ञेश प्रशांत कदम हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रिमा ठाकुर, महेश चव्हाण, गंगा वैद्य, सोमनाथ बागुल, अमेय देसाई, प्रभू पंचलिंग, वैशाली भांगरे व तेजश्री सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!