मानसिक अस्थिर अवस्थेत परभणीतून भरकटलेल्या जुलेखा शेख यांचे अडीच वर्षांनंतर कुटुंबाशी पुनर्मिलन!

गुगल सर्च आणि ChatGPT च्या मदतीने शोधले गाव व कुटुंब
संविता आश्रम टीम चे चिकाटीचे प्रयत्न आणि सेवा शुश्रूषा बद्दल संदिप परब यांनी केले तोंडभरून कौतुक
मानसिक अस्थिर अवस्थेत परभणी येथून भरकटलेल्या ४५ वर्षीय जुलेखा मुखीद शेख यांचे तब्बल अडीच वर्षांनंतर अखेर आपल्या कुटुंबाशी सुखद पुनर्मिलन घडून आले. गुगल सर्च, ChatGPT आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमातील टीमने जुलेखा यांचे गाव व कुटुंब शोधून काढण्यात यश मिळवले.
जुलेखा शेख या मानसिक अस्थिर अवस्थेत परभणी येथून भरकटत मुंबईत आल्या होत्या. कुलाबा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शासकीय महिला भिक्षेकरी गृह, चेंबूर येथील परिवीक्षा अधिकारी श्रद्धा वणगे यांच्या विनंतीनुसार, दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी ४५ वे महानगर दंडाधिकारी न्यायालय, कुर्ला यांच्या आदेशाने जुलेखा यांना सुरक्षा व देखभालीसाठी जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते.
संविता आश्रमात दाखल झाल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी आश्रमाच्या टीमने घेतली. व्यवस्थापक देऊ सावंत, काळजीवाहक मयुरी लोट आणि परिचारिका प्रतीक्षा सावंत यांचे सह संपूर्ण आश्रम टीमने त्यांची विशेष काळजी घेतली. तसेच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. धुरी, डॉ.लेले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.
दरम्यान, जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि संविता आश्रमाच्या टीमने जुलेखा यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या गाव व कुटुंबाविषयी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या बोलण्यातून मिळालेल्या धाग्यांचा आधार घेत गुगल सर्च आणि ChatGPT च्या सहाय्याने शोधकार्य करण्यात आले. त्यानंतर परभणी येथील निर्भया पोलीस पथकाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात यश आले.
अडीच वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या जुलेखा यांना प्रथमच फोनवरून आपल्या कुटुंबीयांशी बोलण्याची संधी मिळाली. या संवादातून त्यांच्या कुटुंबाचा शोध पूर्ण झाला आणि पुनर्मिलनाचा मार्ग मोकळा झाला.
९ नोव्हेंबर २०२६ रोजी जुलेखा यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण उजाडला. त्यांचे पती मुखीद शेख यांनी स्वतः पणदूर येथील संविता आश्रमात येऊन पत्नीची भेट घेतली आणि त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. तब्बल अडीच वर्षांनी पती-पत्नीची भेट घडून आली आणि जुलेखा यांचा कुटुंबात परतण्याचा प्रवास पूर्ण झाला.
कुटुंबापासून दुरावलेली एक निराधार महिला सातत्यपूर्ण संवाद, मानवी संवेदना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पोलिसांचे सहकार्य यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुन्हा तिच्या कुटुंबात गेली याबद्दल जीवन आनंद संस्थे चे अध्यक्ष संदिप परब यानी समाधान व्यक्त करून संविता आश्रम टीम चे,तोंडभरून कौतुक केले.






