नवीन गाडीच्या मागणीवरून नाराजी; १५ वर्षीय मुलाने जीवन संपवले

राहत्या घरी घेतला गळफास
वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या कारणावरून कुडाळ येथे एका १५ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. युवराज विजय परब (वय १५ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हा वडील विजय विद्याधर परब यांच्यासोबत कुडाळ येथील मेहनील प्लाझा येथे भाड्याच्या घरात राहत होता. २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. युवराजने वडिलांकडे नवीन गाडी घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, गाडी घेऊन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने नाराज होऊन त्याने राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी पहाटे १.१९ वाजता कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर वडील विजय परब यांनी पोलिसांना दिली. पुढील नोंद मपोहेका रेडकर यांनी केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार भोई करीत आहेत.
अवघ्या १५व्या वर्षी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.






