‘घर तिथे रोजगार’ संकल्पनेतून सिंधुदुर्गात २० शिवणकाम केंद्र सुरु

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर
‘मी’पासून ‘आपण-आम्ही’पर्यंतचा प्रवास करा – डॉ. सुनीता मोडक
महिलांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता ‘मी’पासून ‘आपण-आम्ही’पर्यंतचा प्रवास केला, तर सक्षम स्त्री, सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज या तिन्ही गोष्टी विकसित होतील, असे प्रतिपादन कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनीता मोडक यांनी केले.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योजकता व रोजगारनिर्मिती उपक्रमांतर्गत २० शिवणकाम रोजगार केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. तीन दिवसांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला डॉ. सुनीता मोडक आणि फाइन आर्टिस्ट व क्राफ्ट ट्रेनर नंदिनी रामचंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. मोडक म्हणाल्या की, कोकणाने सर्वच क्षेत्रांत चांगली प्रगती केली आहे. मात्र, सर्वसामान्य महिलांचाही आर्थिक विकास होणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘घर तिथे रोजगार’ हे आमचे व्हिजन असून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
महिला चूल आणि मूल सांभाळतानाच रणरागिणीप्रमाणे आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. शिवणकामाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाकडे युवा पिढीही वळत आहे, ही समाधानाची बाब आहे.
कोणालाही केवळ आश्वासनांवर ठेवण्यापेक्षा त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सुरुवातीचा काळ प्रत्येकासाठी कठीण असतो; मात्र त्या परिस्थितीवर मात करून सातत्याने काम केले, तर लावलेल्या रोपट्याचा कल्पवृक्ष होतो आणि त्याला फळे येऊ लागतात. आश्रय प्रतिष्ठानने सिंधुदुर्गात लावलेले हे रोजगाराचे रोपटे कल्पवृक्षात रूपांतरित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील २० केंद्रसंचालकांनी पेटवलेली रोजगाराची मशाल अविरत तेवत ठेवून शिवणकामाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आश्रय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव गोरे, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, प्रतीक्षा सावंत, मणिकर्णिका अध्यक्ष उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरुट, ज्येष्ठ गणेशमूर्तिकार सुभाष लाड, सीमा शिंदे, सुजया सावंत, केतन लाड, सचिन सावंत, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
२० शिवणकाम केंद्रांचे उद्घाटन
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील २० शिवणकाम रोजगार केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बांदा येथील सह्याद्री केंद्र, किल्ले निवती येथील श्रुती केंद्र, पाट-वालावल-हुमरमळा येथील रामेश्वर केंद्र, मालवण येथील नूर्वी केंद्र, वेरळ येथील रेशीमबंध केंद्र, पावशी येथील कीर्ती केंद्र, कविलकाटे येथील सत्यभामा केंद्र, तसेच कुडाळ परिसरातील सुतकला, महालक्ष्मी, नित्या, न्यायसिद्धी, नीलाक्षी, सानिका, घे भरारी, मैत्री, पांचजन्य आणि सुदर्शन केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय पिंगुळी येथील मुग्धा आणि गोंधयाळे येथील समृद्धी केंद्राचाही शुभारंभ करण्यात आला.






