पिंगुळीचा पाझर तलाव वाचविण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात

पाझर तलावाच्या संरक्षणासाठी २ नोव्हेंबरपासून उपोषण
माजी आमदार परशुराम उपरकर, वैभव नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील शासकीय पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला आणि २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्हा महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पिंगुळी येथील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीकडून गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच शासकीय पाझर तलाव स्वमालकीचा असल्याचे भासवून त्याची जाहिरात केली जात असून, प्लॉट विक्री सुरू असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या तलावाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे १ हजार ८५० नळधारक ग्रामस्थ अवलंबून आहेत. मात्र, प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी थेट तलावात मिसळण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पाझर तलावाचे अस्तित्व आणि पाण्याचे स्रोत वाचविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून आंदोलन व उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्याला महाविकास आघाडीचा सक्रिय पाठिंबा राहील, असे माजी आमदार परशुराम उपरकर व वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेसचे विजय प्रभू, सचिन ठाकूर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते.






