महामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब
काम थांबविण्याचे कागदी घोड्यांचे आदेश देऊन धूळफेक नको !
कुडाळ : मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या संपादित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू असून ती थांबवा आणि अतिक्रमण हटवा अशी मागणी १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना लेखीपत्र देऊन करण्यात आली. त्यानुसार सदरचे काम थांबविण्याचे आदेश १८ एप्रिल रोजी संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मालकांना देण्यात आले. तरीही सदरचे बांधकाम रात्री हॅलोजन लाईट लावून जोरदार सुरू आहे. याला वरदहस्त राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचा लाभलेला आहे का ॽ असा प्रश्न उपस्थित करून जर राष्ट्रीय महामार्ग अधिकारी राजरोसपणे शासकीय मालमत्तेत अनधिकृत बांधकामे उघड्या डोळ्यांनी पाहून गप्प राहून फक्त काम थांबविण्याचे कागदी घोड्यांचे आदेश देऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत असतील तर हे भूषणावह नाही. त्यामुळे सदरचे बांधकाम हे तत्काळ हटविण्यात यावे तसेच या बांधकामाव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या संपादित क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत जी-जी अनधिकृत बांधकामे करण्यात आली ती तत्काळ जमीनदोस्त करावी, अशी मागणी तेर्से बांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी केली आहे. जर येत्या आठ दिवसात ही कारवाई सुरू केली नाही तर ५ मे २०२३ रोजी तेर्से बांबर्डे ग्रामस्थ सावंतवाडी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील. तरी याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी तेर्से बांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी केली आहे.
प्रतिनिधी, कुडाळ