वन्यप्राणांमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम वाढवून मिळावी

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व राष्ट्रवादी पदाधिकारी यांची उपवनसंरक्षक यांच्याकडे मागणी
वन्यजीव प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती व फळबागांच्या नुकसानीची नुकसानभरपाईची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती, बागायती व फळपिकांवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही काळापासून वन्यजीव प्राण्यांकडून शेती पिके, भाजीपाला तसेच नारळ, सुपारी, काजू, आंबा इत्यादी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई ही प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे.
वन्यजीवांमुळे झालेल्या शेती व फळबागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना सुलभ व पारदर्शक करण्यात यावी.
प्रत्यक्ष बाजारभाव व उत्पादन खर्चाचा विचार करून नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्यात यावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम विनाविलंब अदा करण्यात यावी. वन्यजीवांकडून शेतीचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मदत व मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, वाढीव भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असल्याची माहिती श्री. शर्मा यांनी यावेळी दिली.
जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, प्रदेश चिटणीस सुरेश गवस,किसान सेल जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान,प्रांतिक सदस्य विलास गावकर्,कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष सौ. रिद्धी परब, महिला शहर अध्यक्ष सौ मानसी देसाई, डॉक्टर तुषार भोसले, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष विलास पावसकर,आदी उपस्थित होते.






