गुटखा विक्री प्रकरणातल्या कणकवलीतील दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जमीन फेटाळला

आता उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडे धाव घ्यावी लागणार
अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजन शांताराम पारकर (वय 61, रा. जळकेवाडी, कणकवली) व आरोपी रवींद्र मुकुंद माणगांवकर (वय 34, रा. बाजारपेठ, कणकवली) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. 30 जुलै 2026 रोजी बांदा पोलीस चेकपोस्ट येथे 5 लाख रक्कमेच्या मारुती इको कारमधून 3 लाख 22 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच मोबाईल असा मुद्देमाल बांदा पोलिसांनी पकडला होता. बांदा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक 189/2026 दाखल असून, भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये मुख्य आरोपी आसिफ मेमन ( रा. कोलगाव, सावंतवाडी) तसेच कृष्णा केळजी (रा. वेंगुर्ले ), गणेश शिवगण (रा. जामसंडे देवगड), शिवाजी चव्हाण (रा. फणसोप, रत्नागिरी), राजन पारकर, (रा. जळकेवाडी, कणकवली) रवींद्र माणगावकर (बाजारपेठ, कणकवली) तपर्शि आमोणकर (रा. म्हापसा, गोवा) यांच्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात 30 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी राजन शांताराम पारकर व रवींद्र माणगावकर याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाला हरकत घेत सरकारी वकील संदीप राणे व रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे मांडले. या दोन्ही सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवाद नुसार आरोपी राजन पारकर, रवींद्र माणगावकर यांचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सक्रिय सहभाग असून आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर याने यापूर्वी मुख्य आरोपी मेमन याच्याकडून प्रतिबंधित गुटखा माल खरेदी करून त्याची विक्री करून आर्थिक लाभ प्राप्त केला आहे., प्रतिबंधित गुटखा माल पुरवठादार, मालक, वित्तपुरवठा करणारे अन्य सहआरोपी आणि वितरण साखळीचा तपास सुरू आहे.. प्रतिबंधित गुटखा खरेदी-विक्रीबाबत मुख्य आरोपी मेमन याच्याशी आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर याचे संभाषण झाले असून, आर्थिक व्यवहार व अन्य पुराव्याकरिता राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचा मोबाईल जप्त करायचा आहे. आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांना जामीन मंजूर झाल्यास तो आपला मोबाईल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करणार नाही तसेच तपासास सहकार्य करणार नाही, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून प्रतिबंधित गुटखा माल खरेदी करणारा आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर नजरेआड असून त्यांना अटक करून तपासकाम करणे बाकी आहे, सदर गुन्हा लोकांच्या सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर स्वरूपाचा असून समाजहित लक्षात घेऊन आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचा जामीन अर्ज नाकारावा, प्रतिबंधित गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अशा गुन्ह्यात सहज जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असून आरोपीला कायद्याचा धाक राहणार नाही. वरील मुद्दे न्यायालयासमोर मांडत सरकारी वकील संदीप राणे व रुपेश देसाई यांनी आरोपी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याबाबत युक्तिवाद न्यायालयासमोर केला. आरोपीच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी आपले म्हणणे मांडले. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आता अटक टाळण्यासाठी हायकोर्टात या दोन्ही संशयित आरोपींना धाव घ्यावी लागणार आहे.






