कलमठ ग्रा.पं.ने ई-कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा

जि. प. च्या सीईओ डॉ. अपूर्वा बासूर यांची अपेक्षा
कलमठ ग्रा. पं. येथे जिल्हास्तरीय सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवस सुट्टी न घेता काम करीत आहेत. मोदी यांचा हार्डवर्क करण्याचा गुण चांगला असून त्यांच्या हा गुण प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गावागावांचा शाश्वत विकास होण्यासाठी विविध अभियाने व योजना राबविण्यात येत आहेत. याचा लाभ गावांनी घेतला पाहिजे. कलमठ ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. तसेच ई-कचरा विल्हेवाट लावण्याचे काम अवघड आहे. ई-कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कलमठ ग्रापंचायतीने पुढाकार घ्यावा, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने १७ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान रबिवण्यात येत आहे. या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ कलमठ ग्रा. पं. श्री देव काशिकलेश्वर सभागृहात येथे डॉ. अपूर्वा बासूर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा इंगवले-काळगे, जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, सरपंच संदीप मेस्त्री, जि. प. चे अधिकारी किशोरानंद देशमुख, कणकवली पं.स.चे विस्तार अधिकारी आर. एल. शिंदे, पी. जी. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक अभियानात कलमठ ग्रापंचायतीने ग्रामस्थांनासोबत घेऊन सहभागी होऊन या अभियानांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, अशी अपेक्षा डॉ. बासूर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियनाचे त्यांनी कौतुक केले.
जयप्रकाश परब म्हणाले, कलमठ ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबबिले आहेत. ग्रा.पं.च्या प्रत्येक उपक्रमाची दखल शासनाने घेतली आहे. ही बाब कलमठवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. कलमठ ग्रा.पं.ने यापुढील काळात शासनाची अभियाने व योजना प्रभावीपणे राबवून गावचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सरपंच व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
हर्षदा वाळके म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाची विविध अभियाने व योजना कलमठ गावात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कलमठ ग्रामपंचायतीने बेघरांना एकाच ठिकाणी घरकुले बांधून दिली आहेत. कलमठ ग्रा. पं. राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभासाठी जि. प. प्रशासनाने कलमठ गावाची निवड केली, ही बाब कौतुकास्पद आहे. सेवा संकल्प अभियनाच्या शुभारंभासाठी कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रा. पं. निवड केल्याबद्दल जि.प. प्रशासनाने अरुण चव्हाण यांनी आभार मानतानाच कलमठ ग्रा. पं. माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नवीन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. संदीप मेस्त्री म्हणाले, कलमठ ग्रा.पं.ने मागील चार वर्षांत गावात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल आहेत. या उपक्रमांची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. ही कलमठवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. विधवा प्रथाबंदीचा ग्रा. पं. ने निर्णय घेतला असून विधवा प्रथा न पाळणाºया कुटुंबाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. तसेच बेघरांना एकत्रितरित्या घरे बांधून देण्यात आली आहेत. शासनाच्या दाखला वाटप उपक्रमाद्वारे आजपर्यंत ७५० जणांना दाखले वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात ग्रा.पं.च्या माध्यमातून शासनाची अभियाने व योजना ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविली जाणार असून गावाचा शाश्वत व सर्वांगीण केला जाणार असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील नागरिक व विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. आरंभी मान्यवरांचे स्वागत ग्रा. पं. सदस्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय तळवडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, श्रेयश चिंदरकर, नितीन पवार, दिनेश गोठणकर, स्वप्नील चिंदरकर, ग्रा.पं. कर्मचारी गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, महेंद्र कदम, जयेश मेस्त्री, वसंत सावंत, रमेश चव्हाण, ज्योती आमडोसकर, साक्षी रजपूत यांच्यासह नागरिक संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतच्या बहुचर्चित प्रधानमंत्री आवासच्या घरकुल प्रकल्पला भेट दिली.या कार्यक्रमानंतर सीईओ डॉ. अपूर्वा बासूर, अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्माल्य गोळा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कलशाच्या उपक्रम व वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.






