कुडाळ तहसील कार्यालयात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढणार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुडाळ तहसील कार्यालयाच्या वतीने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय तसेच मंडळ अधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली महसुली अर्धन्यायिक प्रकरणे आपसी तडजोडीने आणि गतीने निकाली काढण्यात येणार आहेत.
या अभियानामध्ये संबंधित प्रकरणांतील वादी, प्रतिवादी, अपीलार्थी व गैरअपीलार्थी यांना नोटीस देऊन प्रकरणे प्राधान्यक्रमाने निकाली काढण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तहसीलदार कार्यालय कुडाळ येथील न्यायालयातील अपील प्रकरणे (अधिकार अभिलेख/कुळकायदा विषयक) तसेच मंडळ अधिकारी स्तरावर सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी फेरफार नोंदी या प्रकरणांचा अभियानांतर्गत तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.
या दिवशी होणार सुनावणी
तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित प्रकरणांच्या तडजोडीसाठी सुनावणी होणार आहे.
तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंडळ अधिकारी कार्यालय कासाल, ओरोस बु., कुडाळ, वालावल, मडगाव, पिंगुळी, झाराप, माणगाव, घोडोस आणि कडावल या मंडळांशी संबंधित प्रकरणांसाठी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील संबंधित हितसंबंधित, पक्षकार व अर्जदारांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी संबंधित महसूल न्यायालयाशी विहित कालावधीत संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.






