कुडाळ स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रमात सहभागी व्हा !

न पं तर्फे ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने गणेश घाट, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ या संयुक्त उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. कुडाळ शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, अस आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आल आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका मांजरेकर आणि मुख्याधिकारी पवळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसर स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अभियानाच्या निमित्ताने भारताच्या नकाशाचा आराखडा तयार करून त्यावर अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितांनी उभे राहत ‘मनुष्यरूपी रांगोळी’ साकारली. या अभिनव उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी पवळ तसेच नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतः हातात झाडू घेत गणेश घाट परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
‘स्वच्छता ही सेवा अभियान’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, तर ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कुडाळ शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!