विवेकाची जागृती करणे म्हणजेच खरे शिक्षण -अजय कांडर

राजापूर मराठे कॉलेज येथे ‘शिक्षक आणि विवेकशीलता’ विषयाची मांडणी
तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात विवेक हरवत चालला आहे. माहितीचा महापूर आला आहे, पण ज्ञानाचा दुष्काळ पडला आहे. अशा सामाजिक व्यवस्थेत विवेक सदैव जागरूक ठेवणे हेच आजच्या शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. विचारनिष्ठा हरवून बसल्याने समाजभान विवेकापासून दूर जात आहे, यासाठी विवेकाच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर विखारे गोठणे येथील आबासाहेब मराठे कॉलेज, सांस्कृतिक विभाग व प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकदिन समारंभात 'शिक्षक आणि विवेकशीलता' या विषयावर अजय कांडर बोलत होते. प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
कवी कांडर म्हणाले,समाजात आज सोयीचे सत्य स्वीकारण्याची लाट आहे. धर्म, जात, पैसा आणि प्रसिद्धी यांच्या नावाखाली असत्याला सत्य म्हणून मांडले जाते. अशावेळी विद्यार्थ्यांना अस्वस्थ करण्याचे, त्यांना सोयीचे सत्य नाकारण्याचे धैर्य देणे हेच शिक्षकाचे खरे विवेकशील कार्य आहे.अनेकदा शिक्षक 'आम्ही तटस्थ आहोत' असे सांगून सामाजिक प्रश्नांपासून पळ काढतात. पण अन्यायाच्या वेळी तटस्थ राहणे म्हणजे अन्यायाची बाजू घेणे होय. विवेकशील शिक्षक कधीही सामाजिक जबाबदारीतून पळ काढू शकत नाही.महाराष्ट्राला प्रा. डॉ. एन. डी. पाटील व कॉम्रेड गोविंद पानसरे यांसारख्या समाजवादी विचारवंतांच्या विवेकशील संघर्षाची परंपरा आहे. दुर्दैवाने आधुनिक युगात माणूसपण संपत असून विवेकशीलता आपण हरवून बसलो आहोत. सामाजिक स्थैर्यासाठी विवेकशीलता अत्यावश्यक आहे. शिक्षकांनी सामाजिक स्थैर्यासाठी महाविद्यालयीन युवकांत विवेकशीलता रुजविणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी रयत शिक्षण संस्थेचा आधारच विवेकशीलता असून रयतसेवक कधीही सामाजिक जबाबदारीतून पळ काढणार नाही असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री, डॉ. अतुल भावे, डॉ. हेमंत अकोलकर, विद्याशाखांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र बावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल टिके यांनी केले तर आभार प्रा. प्रणाली तळवडेकर यांनी मानले.






