माणगावमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

योगेश धुरींचा पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेवर सवाल
माणगाव परिसरात वाढती वाहनसंख्या आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिक, वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
माणगाव बाजारपेठ तसेच मुख्य चौक परिसरात विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक पोलीस व्यवस्था किंवा वाहतूक नियमन प्रभावीपणे होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी प्रशासनाच्या वाहतूक नियोजनावर प्रश्न उपस्थित केला आहे. “माणगावमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व्यवस्था का दिसत नाही? नागरिकांना वाहतूक कोंडीत तासंतास अडकून पडावे लागणार का?” असा सवाल धुरी यांनी केला.
माणगाव हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठ व दळणवळणाचे केंद्र असून, विविध गावांमधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि गर्दीच्या वेळेत आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी योगेश धुरी यांनी केली आहे.






