कुडाळच्या नागरिकांच्या सत्याच्या लढ्याला प्राथमिक यश; उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश

कुडाळच्या नागरिकांच्या सत्याच्या लढ्यालाप्राथमिक यश उच्च न्यायालयाकडून महसूल आदेशांना स्थगिती
नगरपंचायतीविरोधात नागरिकांची याचिका
हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी शहरातील जमीन व मालमत्तेच्या प्रश्नावर सुरू केलेल्या कायदेशीर लढ्याला प्राथमिक यश मिळाले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने संबंधित प्रकरणातील आतापर्यंतच्या महसूल आदेशांना स्थगिती आदेश दिल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
स्वतःच्या मालकीच्या जागेसंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणी कुडाळ नगरपंचायतीकडून फेटाळण्यात आल्यानंतर हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. रिट पिटीशन क्रमांक ४३४२/२०२६ असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर २०२६ रोजी उच्च न्यायालयाने नागरिकांची विनंती मान्य करत संबंधित आदेशांना स्थगिती दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १० जुलै २०२६ रोजी संध्या तेरसे यांनी नगरपंचायतीच्या नावावर असलेली १४१ गुंठे जमीन परत मिळविण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नगरपंचायतीने विशेष सभा आयोजित केली होती. या सभेत २०२४ मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात (MRT) नगरपंचायतीविरुद्ध लागलेल्या निकालाची प्रतही सादर करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निकालाची प्रत मागवून घेतल्यानंतर उच्च न्यायालयात दावा दाखल करायचा की नाही, याबाबत नगरपंचायतीने बहुमताने निर्णय घेतल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीने या प्रकरणात वेळेत पुढील कायदेशीर कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत अखेर हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली.
“दोन वर्षांत नगरपंचायतीला जे करता आले नाही, ते दोन महिन्यांत कुडाळच्या नागरिकांनी करून दाखवले,” असा दावा नागरिकांनी केला आहे. सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला यश मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
या लढ्याला श्री देव कुडाळेश्वर आणि श्री साईबाबांच्या आशीर्वादाने प्राथमिक यश मिळाले असून हे यश नागरिकांच्या एकजुटीला समर्पित करत असल्याचे हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत गणेशोत्सवानंतर सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतही प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.






