कुडाळ गणेश घाटाचे सोमवारी लोकार्पण

भंगसाळ नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण

ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील भंगसाळ नदीकाठच्या गणेश घाट बांधकामासह परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या विकासकामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे.
नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, दीपक केसरकर यांच्यासह पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर, जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पवळ तसेच लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गणेश घाटाच्या बांधकामासोबतच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आल्याने कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नागरिकांसाठी नदीकाठचा हा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आकर्षक सार्वजनिक ठिकाण म्हणून विकसित होणार असून, त्यातून शहराच्या पर्यटन क्षमतेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कुडाळ शहरातील नागरिकांना नदीकाठच्या परिसरात रमणीय वातावरण उपलब्ध करून देणे आणि शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यातही कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास कुडाळ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!