जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा राजीनामा

सेवामुक्तीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणार

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा दिला असून, शासकीय सेवेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सेवामुक्तीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट बेसिस) पद्धतीने वैद्यकीय सेवा बजावणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्रीपाद पाटील हे कुडाळ येथे वास्तव्यास असून, गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बजावत आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांनी अनेक वर्षे निवासी शल्यचिकित्सक म्हणून काम केले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते जिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक पदाची जबाबदारी सांभाळत होते.
जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांशी तसेच लोकप्रतिनिधींशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दरम्यान, वयाच्या ५३ वर्षे सहा महिन्यांच्या टप्प्यावर त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नियमानुसार सेवानिवृत्तीला अद्याप सुमारे साडेपाच वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण हा निर्णय घेतल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
“मी राजीनामा दिला असून, सरकारी सेवेतून मुक्त होण्याचा माझा निर्णय ठाम आहे,” असे त्यांनी सांगितले. सेवामुक्तीनंतरच्या नियोजनाबाबत विचारले असता, वैद्यकीय क्षेत्रातील सेवा सुरूच ठेवणार असून वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकुशल आणि अनुभवी शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पाटील यांनी अचानक राजीनामा दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात हा निर्णय चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या सेवामुक्तीची बातमी अनेकांसाठी धक्कादायक मानली जात आहे.

error: Content is protected !!