सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे पुष्पसेन सावंत – प्रा. अरुण मर्गज

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत माजी आमदार पुष्पसेन सावंत यांना ८२व्या जयंतीनिमित्त अभिवादन

“सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे माजी आमदार पुष्पसेन सावंत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना कोणत्याही लाभ-मोहाचा विचार न करता सडेतोड भूमिका घेणे आणि संघर्ष करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता,” असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली अर्पण करताना प्राचार्य मर्गज बोलत होते.
यावेळी बोलताना मर्गज यांनी पुष्पसेन सावंत यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला. आमदारकीच्या काळात त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सातत्याने आवाज उठवला. साधी राहणी, समाजाप्रती असलेली तळमळ आणि शिक्षणापासून वंचित घटकांसाठी काम करण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय होती. इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्यांचे हे कार्य दुर्लक्षित करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
“पुष्पसेन सावंत यांच्या कार्याचा वारसा जतन करून त्यांचा विचार आणि वसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे मर्गज यांनी नमूद केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची स्थापना आणि जडणघडणीच्या काळात पुष्पसेन सावंत यांनी वडीलकीच्या नात्याने संस्थेला दिलेले मार्गदर्शन व पाठबळ महत्त्वपूर्ण होते. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासमोर असलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांमध्ये पुष्पसेन सावंत यांचा समावेश होता, असेही प्राचार्य मर्गज यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पुष्पसेन सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, ज्युनिअर कॉलेजचे मंदार जोशी, चित्राकुंटे, रोहिदास राणे, अदिती घाडीगावकर, प्रसाद कानडे, देविदास नागोळकर, शमिका भिसे, प्राजक्ता मेस्त्री, रेश्मा घाडी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!