गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची महावितरणला धडक

शहरातील वीज समस्यांवर ‘अल्टिमेट’!

जीर्ण पोल, कमी दाबाचा वीजपुरवठा, धोकादायक झाडे आणि वारंवार वीजखंडित होण्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील वीज समस्यांचा पाढा वाचत कुडाळ शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत गणेश चतुर्थीपूर्वी सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कुडाळ शहरातील अनेक भागांमध्ये जुने व जीर्ण झालेले वीज खांब असून, ते धोकादायक बनले आहेत. तसेच काही भागांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज वाहक तारांवर आलेली जीर्ण व धोकादायक झाडे तातडीने तोडून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी सूचनाही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळे व शाळांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने या कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच वारंवार वीजखंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील वीज समस्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला अल्टिमेटम दिला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राउळ, तालुका चिटणीस राजू गवंडे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मुक्ती परब, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, सौ. ज्योती जळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब तसेच माजी नगरसेवक सचिन काळप उपस्थित होते.

error: Content is protected !!