गणेश घाट सुशोभीकरणाचे श्रेय विनायक राऊत-वैभव नाईक यांनाच

मंदार शिरसाट यांचा दावा

कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनाच जाते, असा दावा कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केला आहे.
मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित शिमगोत्सवासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आले असताना, कुडाळ शहराचा तत्कालीन उपनगराध्यक्ष या नात्याने भंगसाळ नदीवरील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामास तातडीने मंजुरी देण्याची मागणी शहरवासीयांच्या वतीने करण्यात आली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गणेश घाट सुशोभीकरणासाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासंदर्भातील शासन निर्णय (क्रमांक ननपं २०२२/प्र.क्र. ६६ (क-९५-१)/नवी-१६) हा ३० मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
श्री. शिरसाट यांनी पुढे सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले. त्यावेळी गणेश घाटाच्या आराखड्याबाबत आणि मंजुरीबाबतच्या बातम्याही विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या होत्या.
याशिवाय तत्कालीन पालकमंत्र्यांनीही गणेश घाटाच्या कामासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला पाठबळ दिले होते. त्यामुळे भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनाच असल्याचा पुनरुच्चार मंदार शिरसाट यांनी केला.

error: Content is protected !!