सरंबळ येथे संत बाळूमामा भक्तजन रंगले गुरुपौर्णिमेच्या उत्सवात

श्री क्षेत्र माणगाव महात्म्य या पुस्तकाचे प्रकाशन
श्री संत बाळूमामाच्या भक्तांसाठी सरंबळ येथे शनिवारी सत्संग साधना मंडळ, सरंबळ यांच्या वतीने “गुरुपौर्णिमा महोत्सव 2026” मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.
सरंबळचे माजी सरपंच अजय कदम यांच्या सरंबळ येथील निवासस्थानी हा सोहळा पार पडला. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा महोत्सव 2026 या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर तसेच उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र माणगाव महात्म्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. .
सकाळपासूनच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सकाळी ६ वा. नामस्मरणाने सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य यजमानांच्या हस्ते सद्गुरु पूजन करण्यात आले. सकाळी १० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. भाऊ नाईक वेतोरे यांच्या शुभहस्ते मातृ वंदना झाली. त्यानंतर त्यांचे सुश्राव्य किर्तन भाविकांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमात दुपारी १ वा. महाआरती आणि १.३० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३ वा. विद्यार्थी गुण गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आईची पद्यपूजा करून गुरुपौर्णिमा निमित्त आगळावेगळा उपक्रम सुरू केला. सुमारे ३० मुलांनी आईचे पद्य पूजन केले. जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला. सायंकाळपासून रात्री १०.३० वा. पर्यंत विविध भजन मंडळांचे सुश्राव्य भजन झाले.
या गुरुपौर्णिमा महोत्सवाला जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी बाळूमामांचे दर्शन घेतले आणि भाविकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावातील एकोपा वाढतो. सत्संग साधना मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्संग साधना मंडळ, सरंबळसरपंच रावजी कदम रामदास तेंडोलकर आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






