हे अभियान म्हणजे विविध योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम!

पालकमंत्री नितेश राणे यांचे उद्गार

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारातून प्रेरणा घेत राज्य शासनाने राबविलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ हे नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महसूल समाधान अभियानात ते बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्येही नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले आणि प्रमाणपत्रे देण्यात येत असून, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे शासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.

प्रशासनाने वर्षभर याच गतीने, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनातून काम केले तर शासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे सांगत त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवेदनशीलतेने वागून त्यांच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडविण्याचे आवाहन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले असून, शासनात अशक्य असे काहीच नसते, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर प्रत्येक प्रश्नाचे समाधान होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा सखोल अभ्यास करून त्या प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करत त्यांनी लाभार्थी निवड पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, यावर भर दिला. दुर्गम व डोंगराळ भागात ऑनलाइन सेवांमध्ये अडचणी येत असल्यास नागरिकांना लाभापासून वंचित ठेवू नये आणि आवश्यकतेनुसार ऑफलाइन प्रक्रियेलाही प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

error: Content is protected !!