योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत -आमदार निलेश राणे

कुडाळमध्ये ‘समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समाधान शिबिरात योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आम. राणेंचा भर

सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी आज अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, तो दिवस मला पाहायचा आहे. मी आमदार आहे, पण मी इथे कायमचा राहण्यासाठी आलेलो नाही. तुम्ही अधिकारीसुद्धा इथे कायमचे राहण्यासाठी आलेले नाहीत याची जाण ठेवा असं त्यांनी सांगितलं. कुडाळ येथे झालेल्या समाधान शिबिरात योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आम. निलेश राणे यांचा भर दिसून आला.
​कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि माजी मुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सभापती मिलिंद नाईक, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बादेकर-शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसिलदार गणेश लव्हे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, संजय गवस, जि. प. सदस्य नागेश आईर, सुप्रिया वालावलकर, दिप्ती पडते,आरती पाटील, सुमेधा पाताडे, काका कुडाळकर, गटविकास अधिकारी मनोज भोगटे,गटशिक्षणाधिकारी श्री.राऊत यांच्यासह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा रूपी चित्रफित दाखवण्यात आली.
यावेळी आ.निलेश राणे म्हणाले, अजूनही अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांना सरकारी योजनांची माहितीसुद्धा नाही. शासन म्हणून आपण त्यांच्या दारापर्यंत गेले पाहिजे. मी सभागृहात लोकांच्या हक्कासाठी भांडतो, म्हणून काही जणांना मी भांडखोर वाटतो. पण मी जेव्हा सभागृहात उभा राहतो, तेव्हा मी पक्षाचा विचार करत नाही; मी या मातीचा आहे हे लक्षात ठेवून बोलतो. सिंधुदुर्ग जिल्हा आकारीपड, कबुलायतदार, इको-सेंसिटिव्ह आणि वनसंज्ञेत अडकला आहे. यातून कोकणाला मार्ग काढून द्यावाच लागेल. तसेच, तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, तो दिवस मला पाहायचा आहे,असे सांगत त्यांनी कुडाळ महसूल प्रशासनाच्या कामाचे कौतुकही केले.
प्रास्ताविकात प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी प्रशासकीय उपक्रमांची माहिती दिली. कुंभार समाजाला ओळखपत्र आणि ७०० ब्रास विनाअट माती रॉयल्टी मुक्त देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘शाळा तिथे दाखले’ मोहिमेअंतर्गत एका महिन्यात तब्बल २० ते २२ हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कुडाळसाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते योजना राबवली जात असल्याचे त्यांनी सांगित या संपूर्ण कामात आमदार निलेश राणे यांचे मोलाची साथ लागल्याचेही त्यांनी सांगितले. ​उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्गात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ९३% प्रगती साध्य झाली असून कृषी व वन विभागासाठी विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान आ. निलेश राणे यांनी नगरपंचायत ते महसूल विभागाच्या विविध २० स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. पुरात वाहून जाऊन मृत झालेल्या गणेश पालव यांच्या नातेवाईक संजीवनी पालव यांना ४ लाख रुपयांच्या मदतीचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. याशिवाय कातकरी समाज बांधवांना जात प्रमाणपत्रे, महिला शेतकऱ्यांना दाखले, कृषी योजनांचे साहित्य, केशरी शिधापत्रिका आणि ३ महिन्यांच्या धान्याचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.​ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हॉलबाहेरही विशेष स्क्रीन लावण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आभार कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केलं. जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या या शिबिरांमुळे हजारो लाभार्थ्यांना त्वरित, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा मिळत असून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे साकार होत आहे.

error: Content is protected !!