जातीवाचक शिवीगाळ प्रकरण : गणेश गावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला!

विशेष न्यायालय सिंधुदुर्ग चा आदेश

देवगड तालुक्यातील मीठमुंबरी येथील गणेश जगदीश गावकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. विशेष न्यायाधीश एस. एस. इंदुलकर यांनी शुक्रवारी हा आदेश दिला. यापूर्वी न्यायालयाने सुनावणीपर्यंत आरोपीला अंतरिम संरक्षण (Interim Protection) दिले होते. अंतिम सुनावणीनंतर मात्र अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने नकार दिला.
फिर्यादीनुसार, कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रहिवासी असलेले २ जुलै रोजी देवगड तालुक्यातील मुनगे येथे बॅनर लावण्याच्या कामासाठी गेले असता आरोपी गणेश गावकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. या घटनेनंतर देवगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (लागू असलेली संबंधित कलमे) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानुसार देवगड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अटकेची शक्यता लक्षात घेऊन गणेश गावकर यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर प्रारंभी न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर झालेल्या अंतिम सुनावणीत फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. रुपेश देसाई यांनी न्यायालयासमोर सविस्तर युक्तिवाद मांडला.
ॲड. देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील तरतुदींचा संदर्भ देत, प्रथमदर्शनी आरोपीचा गुन्ह्यात सहभाग दिसून येत असल्यास अटकपूर्व जामीन देण्यास कायद्यात मर्यादा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तपासाच्या दृष्टीने आरोपीची उपस्थिती आवश्यक असून तपासात सहकार्य मिळण्यासाठी त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
या सुनावणीत जिल्हा पोलीस विभागाच्यावतीनेही अटकपूर्व जामीन अर्जास विरोध करण्यात आला. तपास अद्याप सुरू असून आरोपीला अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे, गुन्ह्याची नोंद, तपासाची स्थिती आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून विशेष न्यायाधीश एस. एस. इंदुलकर यांनी आरोपी गणेश जगदीश गावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

error: Content is protected !!