पशुपैदास क्षेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे कुलगुरूंना निवेदन
तालुक्यातील निळेली येथील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ व मनमानी कारभारावर आक्षेप घेत त्यांच्या तत्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्गच्या (IHRWA) वतीने यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब आणि महिला जिल्हासचिव संजना सावंत यांनी हे निवेदन सुपूर्द केले.
या निवेदनानुसार, पशुपैदास क्षेत्रातील कुशल पशुवैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधीक्षक विष्णू सखाराम कवीटकर हे मागील ३० वर्षांपासून, तर कृषी सहाय्यक उमेश कृष्णा पायशेट हे मागील १८ वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. शासकीय नियमांना डावलून हे अधिकारी एकाच ठिकाणी टिकून असून मनमानी कारभार चालवत असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. गेली ३० व १८ वर्षे हे कर्मचारी नेमक्या कोणत्या नियमांतर्गत एकाच कार्यालयात सेवा बजावत आहेत, याचा स्पष्ट खुलासा विद्यापीठाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या दीर्घ कालावधीत परिसरातील शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रत्यक्ष फायदा झालेला नाही. तसेच, कार्यालयामार्फत कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रम किंवा सुधारणा राबवल्या गेलेल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. विशेष परिस्थितीत मुदतवाढ दिली गेली असल्यास, ती कोणाच्या आदेशाने व कोणत्या कारणास्तव देण्यात आली, याचा लेखी खुलासा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांची तत्काळ अन्यत्र बदली करावी, अशी आक्रमक भूमिका वेल्फेअर असोसिएशनने घेतली आहे.






