कलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा;अन्यथा उपोषण

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रा. प . सदस्य धीरज मेस्त्री यांचा इशारा
महावितरणकडून कलमठ गावात स्वतंत्र नवीन फीडरचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. तसेच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे वारंवार लक्ष वेधले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवीन फीडरचे काम येत्या १० दिवसांत पूर्ण करावे, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण बसणार असा इशारा ग्रा. पं. सदस्य तथा ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, कलमठमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कलमठ यांच्यावतीने अनेक वेळा महावितरण कार्यालयाकडे तक्रारी व निवेदने सादर करण्यात आली आहेत. तसेच आपल्या अधिकाºयांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना स्वतंत्र नवीन फीडरचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लेखी अर्जही सादर करण्यात आला होता. परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच आवश्यक देखभाल नियमितपणे करण्यात आलेली नाही.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कलमठ गावातील गणेशमूर्तिकारांचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. याशिवाय विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, नागरिकांची विजेअभावी कामे खोळंबत आहेत. महावितरण या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेऊन कलमठ गावासाठी मंजूर नवीन फीडरचे काम येत्या दहा दिवसांच्या आत पूर्ण करावे. तसेच गावाला सुरळीत, अखंडित वीजपुरवठा कायमस्वरूपी होण्यासाठी उपाययोजना तातडीने कराव्यात. अन्यथा, महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्याविरोधात ग्रामस्थांनासोबत घेऊन १५ आॅगस्ट रोजी लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल. या उपोषण दरम्यान उद्भवणाºया कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा मेस्त्री यांनी दिला आहे. निवेदनावर गणेशमूर्तीकार प्रथमेश मठकर, समीर गुरव, सदानंद आमडोसकर, संदेश गोठणकर, गणेश गोठणकर, बाबू वर्देकर, गौरव चिंदरकर, राघोजी वावळे, संतोष चिंदरकर, उत्तम चिंदरकर, प्रकाश वर्देकर यांच्या सह्या आहेत.






