‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत कुंभवडे हायस्कूलचे उत्तुंग यश

उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडेच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर यशाचा झेंडा फडकावला आहे. संपूर्ण दशक्रोशीत या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारी कुंभवडे हायस्कूल ही एकमेव प्रशाला ठरली असून विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी केवळ दोनच शाळांची निवड झाली असून त्यामध्ये कुंभवडे हायस्कूलचा समावेश झाल्याने शाळा, विद्यार्थी आणि परिसरासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे आणि ‘कुमार विश्वकोश’चा प्रभावी वापर वाढवणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने सुरू केलेला हा एक अभिनव उपक्रम आहे. यावर्षी कुंभवडे हायस्कूलचा या स्पर्धेतील हा पहिलाच सहभाग होता, मात्र पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारत उल्लेखनीय यश संपादन केले.
वाचन संस्कृती व तंत्रज्ञानाचा अनोखा संगम
या स्पर्धेत कुंभवडे शाळेतील इयत्ता नववीच्या १३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि ‘कुमार विश्वकोश’चा प्रभावी वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांची नामावली
राज्य स्तर
आदिती मठकर – चतुर्थ क्रमांक
प्रतिक पवार – चतुर्थ क्रमांक
गणेश ठुकरुल – चतुर्थ क्रमांक
जिल्हा स्तर (सिंधुदुर्ग)
सोहम टेंबुलकर – प्रथम क्रमांक
अक्षया गोवेकर – द्वितीय क्रमांक
गुरुप्रसाद नाकील – द्वितीय क्रमांक
रत्नदीप सावंत – द्वितीय क्रमांक
तालुका स्तर (कणकवली)
हर्षाली सावंत – प्रथम क्रमांक
वेदांत कदम – द्वितीय क्रमांक
यश गावकर – तृतीय क्रमांक
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मराठी विभाग प्रमुख श्रीम. स्नेहल राणे मॅडम यांनी मार्गदर्शन केले
जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपजिल्हाधिकारी मा. शुभांगी साठे मॅडम यांच्या शुभहस्ते कुंभवडे प्रशालेच्या सर्व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे मॅडम, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाशी संबंधित श्री. कांबळी, श्री. आसोलकर आणि श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड, वाचनाची प्रेरणा आणि ज्ञानार्जनाची जिज्ञासा कायम ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा दीपक सावंत, मार्गदर्शक विषय शिक्षिका श्रीमती स्नेहल राणे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण परिश्रमांचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
विशेष म्हणजे, राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांचा अंतिम बक्षीस वितरण समारंभ मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून, त्या समारंभात कुंभवडे हायस्कूलच्या राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार मा. अरविंद जी सावंत साहेब, संस्था सचिव मा. शशिकांत सावंत साहेब, सर्व विश्वस्त, शालेय समितीचे कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, सर्व शालेय समिती सदस्य, गुरुकुल समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा दीपक सावंत, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीम.स्नेहल राणे मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करून शाळा, संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यभर गौरवावे, अशा शुभेच्छा सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तेच्या बळावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.






