कणकवलीतील पत्रकारांमुळेच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी

फ्लाय ओव्हर ब्रिज खालील जागेच्या वाटपा संदर्भातील वादा दरम्यान चित्रीकरण करू नका अशा नगराध्यक्षांच्या सूचना होत्या

पत्रकारांच्या भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त करते: मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवलीत उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्यासाठी मार्कीगचे काम चालु होते. यावेळी वृत्तांकनासाठी गेलेल्या कणकवलीतील पत्रकारांना चित्रिकरण करु नका, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला होता. याबाबत कणकवली तालुका संघाच्या पदाधिका-यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेवुन विचारणा केली. त्यावर आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार असे बोलले नाही, मात्र चित्रिकरण करु नका ही सुचना नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सुचनेनुसार मी केली. जर पत्रकारांची भावना दुखावल्यास मी दिलगिरी व्यक्त करते, असे गौरी पाटील यांनी सांगितले. यावेळी कणकवलीतील पत्रकारांमुळेच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाली असल्याची कबुलीही दिली.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी दालनात मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, तालुकाध्यक्ष भगवान लोके, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, माजी अध्यक्ष अजित सावंत, सुधीर राणे, विरेंद्र चिंदरकर, सहसचिव दर्शन सावंत, खजिनदार रोशन तांबे,राजेश सरकारे, उमेश बुचडे, दिगंबर वालावलकर, तुषार हजारे, मयुर ठाकुर, राजन चव्हाण, भास्कर रासम, संजय बाणे, राजेंद्र दळवी, साहील बागवे, मिलिंद पारकर आदी पत्रकार उपस्थित होते.
फळ व भाजी विक्रेत्यांना जागा निश्चीत करत असताना सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पत्रकार वृत्तांकनास गेले होते. त्यावेळी संबंधित विक्रेत्यांचा जमाव होता. त्यादरम्यान वृत्तांकन सुरु असताना चित्रिकरण करु नका, फोटो घेवु नका अशी सुचना देताना अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करेन, असा इशारा तिथे उपस्थीत असलेल्या पत्रकारांना तुम्ही का दिलात? अशा पद्धतीने लोकशाहीची मुस्कटदाबी तुम्ही करणार का? हे लोकशाहीला घातक आहे. यासारखे मुद्दे मांडत पत्रकार गणेश जेठे, संतोष राऊळ, भगवान लोके आदी पदाधिका-यांनी चर्चा केली. यावेळी अन्य पत्रकारांनी यासंदर्भात भुमिका मांडली.
त्यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवलीत आल्यानंतर पत्रकारांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता येत आहे. कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील व नरडवे रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पत्रकारांनामुळे मोठे पोलीस संरक्षण घेण्याची गरज पडली नाही. पत्रकारांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु कालच्या घटनेमध्ये जमाव गोळा झाला होता. त्यामुळे काही अनावधानाने माझ्याकडुन शब्द आले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. यापुढील काळात पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. यापुढे माझ्याकडुन अशा पद्धतीने अटकाव होणार नसल्याचे तसेच माझ्याकडून होणाऱ्या वक्तव्याचा कुणी कशाप्रकारे गैरफायदा घेतो ते यानिमित्ताने मला दिसले असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले.
या घटनेबाबत सकारात्मक चर्चा झाली. पत्रकारांनी या पुढील काळात नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य राहील, असे सांगितले.

error: Content is protected !!